राज्यातील थंडीचा कडाका कायम ; पहा किती दिवस ; सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत असून किमान तापमानामध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आगामी काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव टिकून असून, काही जिल्ह्यांमध्ये पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे.
उत्तर भारताचा विचार करता, तेथे कडाक्याच्या थंडीसह धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये थंडीची लाट तीव्र आहे. मध्य प्रदेशातील राजगड येथे देशातील सर्वात कमी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर दुसरीकडे केरळमधील कोटायम येथे ३५.५ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. देशाच्या विविध भागांतील हवामानातील हे टोकाचे बदल प्रकर्षाने जाणवत आहेत.















