जानेवारी 2026 चा अंदाज ; शेतकरी मित्रांनो, जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला हवामानात कोणते बदल होणार आणि मान्सून २०२६ ची स्थिती कशी असेल, याबद्दल हवामान अभ्यासक तोडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सध्या कडाक्याची थंडी असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, परंतु १ जानेवारीपासून ही थंडी कमी होऊन उन्हाचा चटका वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जानेवारीतील हवामान आणि पिकांची काळजी तोडकर यांच्या अंदाजानुसार, २८ डिसेंबरपासूनच थंडीचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होईल आणि १ जानेवारीपासून महाराष्ट्रात उष्णतेचे वातावरण निर्माण होईल. या काळात विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या दरम्यान धुके आणि ढगाळ हवामानामुळे कांदा, तूर आणि हरभरा पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे कांदा उत्पादकांनी १ जानेवारीच्या आतच प्रभावी बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी, असा सल्ला तोडकर यांनी दिला आहे.
पाऊस, गारपीट आणि अफवांकडे दुर्लक्ष पावसाबाबत बोलताना तोडकर यांनी स्पष्ट केले की, जानेवारी महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही, फक्त काही ठिकाणी किरकोळ थेंब पडू शकतात. तसेच सध्या सोशल मीडियावर जानेवारी-फेब्रुवारीत गारपीट होणार असल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या अफवा असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. फेब्रुवारीपर्यंत तरी मोठी गारपीट किंवा नुकसानकारक पाऊस होणार नाही. तोडकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, चुकीच्या थंबनेल आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओंवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे.
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज २०२६ च्या मान्सूनबद्दल तोडकर यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. यंदा मान्सूनची स्थिती ‘न्यूट्रल’ (तटस्थ) राहणार असून, परतीचा पाऊस अत्यंत जोरदार असेल, ज्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. पेरणीच्या काळात काही ठिकाणी पावसाची ओढ बसू शकते, परंतु एकूण मान्सून समाधानकारक राहील. मान्सूनचा सविस्तर आणि खात्रीशीर अंदाज ५ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही दुष्काळाच्या अफवांना बळी पडू नये, असे तोडकर यांनी आवर्जून सांगितले आहे.